तांबट
बकानाच्या झाडावर टकटक आवाज आला म्हणून पाहिले.सुतार पक्षी दिसला. खरे तर असाच आवाज सुतारपक्षी करतो. त्याने पूर्ण घरटे केल्यावर हा तांबट आला नि त्याच्याशी भांडण करून त्या बिळावर या जोडीने कब्जा मिळवला. हा पक्षी शाळेजवळ पहिल्यांदा पहिला.नाव माहिती नव्हते. शोध घेतल्यावर तांबट नाव समजले. आज बरेच तांबट पक्षी शाळेच्या अवती भवती वावरताना दिसतात. शाळेच्या भिंतीवर या चारपाच जोड्या येवून वरवंडी वरील वाळू घेवून जाताना मी पाहिलं. तेव्हाचा हा फोटो.
(शास्त्रीय नावः Megalaima haemacephala indica) हा महाराष्ट्रात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर आढळणारा पक्षी आहे. याला इंग्रजीत कॉपरस्मिथ किंवा क्रिमसनब्रेस्टेड बार्बेट तर हिंदीत छोटा बसंत असे म्हणतात. हा तांबूस रंगाचा असून साधारणपणे चिमणीच्या आकाराचा असतो. अतिशय दाट झाडीत याचे वास्तव्य असल्याने सहजपणे दिसत नाही. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात यांचे दिवसभर तांब्यावर घण घालताना जसा आवाज येतो तसा दिवसभर आवाज काढत रहातो. त्यामुळे याचे अस्तित्व लक्षात येते. याचे पुकपुक्या असे स्थानिक नावही काही ठिकाणी आढळते.
या पक्ष्याच्या कपाळ आणि छातीवर किरमिजी रंग असतो. डोळ्यांच्या वर व खाली अर्धवर्तुळाकार पिवळे पट्टे असतात पिवळाधम्मक कंठ दिसून येतो तर हिरव्या-पांढऱ्या रंगाचा आरीयुक्त अंतर्भाग असतो. पक्ष्याच्या नर-मादीत फारसा फरक नसतो. तांबट पक्ष्याचे पिल्लू हे हिरव्या रंगाचे असते, परंतु त्याच्या डोक्यावर व छातीवर लाल रंग नसतो.
तांबट पक्ष्याचे वास्तव्य भारतीय उपखंड व दक्षिण-पूर्व आशियातील काही भागांत आढळते. हा येथील कायमचा रहिवाशी आहे. शेतात व बागेतील वृक्षांवर तसेच विरळ झाडीच्या प्रदेशातही तो आढळतो. हिमालयात हा पक्षी तीन हजार फुटांपर्यंत आढळतो. शुष्क वाळंवटी प्रदेशात मात्र हा पक्षी आढळत नाही. मृत झाडांवर वा झाडांच्या मृत खोडांवर हे पक्षी पोकळी करून राहतात. अशा खोडाची निवड करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे या खोडांवर लाकूड पोखरणे त्यांना सोपे जाते. तांबट पक्षी या पोकळीचे घरटे म्हणून वापर करतो. तांबट पक्षी शक्यतो एकटा किंवा जोडीने आढळतो. वड, पिंपळ, अंजीर, जांभूळ अशा झाडांवर हा पक्षी आढळून येतो.
या पक्ष्याच्या आहारात प्रामुख्याने फळांचा समावेश असतो. त्यातही वड-पिंपळाची फळे तो आवडीने खातो. त्याला रसयुक्त फळे आवडतात. तसेच ठरावीक फुलांच्या पाकळ्याही खातो. प्रथिनांची गरज भागवण्यासाठी तांबट पक्षी काही ठरावीक कीटकही खातो. तांबट आपल्या शरीराच्या दीड ते तीन पट फलाहार करतो असे आढळून येते.
फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत तांबट पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. तांबट पक्ष्याची जोडी आपले घरटे एका ठरावीक उंचीवरील आडव्या फांदीवर करते असे आढळून येते. अंडी उबवण्याचे काम नर आणि मादी आळीपाळीने करतात.
No comments:
Post a Comment