बगळा

बगळा


बगळा

रस्त्याने जाताना शेतात नांगरणी चालू असतानां, पाणथळ जागी, नदी, तलावाच्या काठी अन शेतात पाणी चालू असताना हे हमखास दिसतात. ओतुरजवळ प्रवासात असताना रस्त्याच्या कडेला हे निवांत अन्न शोधात फिरत होते. तेव्हाचा हा फोटो.

(बक) . या पक्ष्यांचा समावेश सिकोनिफॉर्मिस गणाच्या आर्डीइडी कुलात करतात. या कुलात साठ जाती आहेत व त्या जगभर पसरलेल्या आहेत. त्यातल्या त्यात उष्ण कटिबंधात यांच्या जास्त जाती आहेत.
बगळे मध्यम ते मोठ्या आकारमानाचे असातात. यांची मान, पाय व बोटे लांब व सडपातळ असतात. यांच्या मानेच्या मणक्याची रचना अशी असते की,मान फक्त उदग्र प्रतलात (उभ्या पातळीत) हलविता येते. ती बाजूस वळू शकत नाही. हा पक्षी विश्रांती घेत असताना त्याची मान इंग्रजी एस् (S) अक्षराच्या आकाराची होते व डोके दोन खांद्यांच्यामध्ये असते. भक्ष्य पकडण्याच्या वेळी मान सरळ केली जाते. हे पक्षी व यांचे जवळचे संबंधी उडताना आपली मान मागे व डोके दोन खांद्यांच्या मध्ये ठेवून उडतात. यामुळे उडते पक्षी बगळे आहेत की नाहीत, हे दुरून सहज ओळखता येते. यांची चोच लांब, सरळ व खंजिरासारखी असते. भक्ष्य पकडण्यास हिचा चांगला उपयोग होतो. यांच्या शेपटीच्या पृष्ठभागावर अविकसित अशी एक ग्रंथी असते. सर्वसाधारण पक्ष्यांत या ग्रंथीतून निघणारा स्त्राव चोचीच्या साह्याने सर्व पंखावर चोळला जातो. यामुळे पंख तकतकीत राहतात. या पक्ष्यांत या ग्रंथीचा विशेष वापर केला जात नाही. छातीच्या पंखांच्या आत चूर्ण भरलेले लहान पंख असतात. हे चूर्ण चोचीच्या साह्याने मोठ्या पंखावर पसरवून हा पक्षी आपले खराब झालेले पंख स्वच्छ करतो. हे करण्यात तो आपल्या मधल्या नखाचाही उपयोग करतो. हे चूर्ण घासल्यावर पंखावर पाणी ठरत नाही.
बगळे दलदलीच्या प्रदेशात, पाण्याजवळ किंवा समुद्रकिनाऱ्यावर आढळतात. ते सर्वसाधारण समूहाने राहतात. यांची घरटी पाण्याजवळच्या झाडांवर किंवा दूरही असतात. पुष्कळ घरट्यांची मिळून एक वसाहत असते. काही वेळा एकाच झाडावर सु. १०० घरटी आढळली आहेत. ते पाण्याच्या पृष्ठावरून अगदी जवळून उडतात किंवा उथळ पाण्यातून हळूहळू चालत जातात अगर एके ठिकाणी स्वस्थ उभे राहतात. हे सर्व करीत असताना त्यांची दृष्टी भक्ष्याकडे असते. जर एखाद्या मासा किंवा बेडूक दिसला की, झडप घालून ते पटकन चोचीने उचलतात.
प्रणयाराधन करताना यांची मान लांब केली जाते व चोच आकाशाकडे फिरविली जाते. एखाद्या झाडाची लहान डहाळी नर आपल्या चोचीच पकडतो व ती मादीस देतो. याचा अर्थ दोघेही एकमेकांस संमती देतात. या डहाळीचा उपयोग नवीन घरटे बांधण्यास अगर जुने सुधारण्यास केला जातो. नर घरटे बांधण्यास लागणारे साहित्य आणून देतो, तर मादी घरटे बांधते.
नर व मादी यांचा सारखाच असतो. या रंगात करडा, निळा, तपकिरी वगैरे विविध छटा असतात. काही नरांमध्ये विणीच्या हंगामात सुरूवातीस डोळ्याच्या पुढची त्वचा डोळ्याच्या इतर रंगापेक्षा वेगळी दिसते. इतर काही जातींमध्ये विणीच्या हंगामात डोके, मान, छाती व पाठ यांवर लांब पिसे येतात. विणीच्या काळात मीलनापूर्वी, पुष्कळ जातींत रंगात फरक होतात. चोच, पाय, नखे यांसारख्या अवयवांत हा फरक प्रामुख्याने दिसतो. हे भडक रंग फार काळ टिकत नाहीत. हिरव्या बगळ्यामध्ये (ब्युटोराइडस व्हिरिसकेन्स) चोचीचा पिवळा रंग नारिंगी दिसू लागतो. तर पायाचा रंगही फिकट पिवळ्यापासून दाट नारिंगी होतो. अंडी देण्याच्या वेळेपर्यंत हे रंग पुन्हा हळूहळू फिके पडू लागतात.
बगळ्यांचा विणीचा हंगाम फेब्रुवारी ते मे असतो. या काळात नर बरेच आक्रमक असतात. नरमादीचे मीलन झाल्यावर मादी घरटे बांधण्याचे काम पुरे करते. व नंतर ती एका वेळी एक अशी आठवड्याच्या काळात सु. चार ते पाच अंडी घालते. अंड्यांचा रंग निळसर हिरवा असतो व त्यांच्यावर ठिपके नसतात. अंड्यांची लांबी ५ ते ५.५ सेंमी. व रूंदी २ सेंमी. असते. नरमादी दोघेही आळीपाळीने अंडी उबवितात. एक महिन्याने अंडे फोडून पिलू बाहेर येते. या वेळी त्यांच्या अंगावर लहानलहान पिसे असतात. सुरूवातीस या पिलांची भूक दांडगी असते. प्रथम नरमादी त्यांना आपल्या चोचीने आपल्या मुखातील अन्न भरवितात. पुढे काही दिवसांनी त्यांना घरट्यांच्या कडेवर ठेवले जाते. ही पिले आपसात भांडतात व वेळप्रसंगी सर्वात लहान पिलू मारून ते खाण्यासही कचरत नाहीत. दोन महिन्यांची झाल्यावर पिले स्वतंत्र रीत्या उड्डाण करतात. सात-आठ महिन्यांची झाल्यावर ती वार्षिक स्थलांतरणात सहभागी होतात.
आर्डीइडी कुलाच्या आर्डीइनी या उपकुलात मोडणाऱ्या बगळ्यांच्या काही जातींना हेरॉन तर काही जातींना इग्रेट असे म्हणतात. दुसऱ्या बोटॉरिनीया उपकुलातील बगळ्यांना बिटर्न असे म्हणतात

No comments:

Post a Comment